आमच्याविषयी

आपली हाक, आमची साथ – एक नवीन दिशा

हाक तुमची साथ आमची सामाजिक संस्था, ठाणे. आमची संस्था गेल्या ९ वर्षांपासून सामाजिक आणि मुख्यतः शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहे. आमच्या संस्थेची सुरुवात गाव मायनी (मोहननगर), खटाव, सातारा येथील पाण्याच्या भीषण टंचाईला तोंड देण्यापासून झाली. २०१५ साली आम्ही बोअरवेल खोदून गावाला पाणी पुरवण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पामुळे आम्हाला पहिल्या ८० फुटांवर पाणी मिळाले, पण भविष्यातील टंचाईला तोंड देण्यासाठी बोअरवेल २२५ फूट खोदली. हे पाणी शेवटपर्यंत मुबलक उपलब्ध होते.

या यशामुळे आमच्या मनात उमेद जागी झाली आणि आमचे कार्य अविरत सुरू झाले. तीन वर्ग मित्रांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या संस्थेचे विस्तार वाढत ५० सदस्यांच्या वृक्षात रूपांतर झाले आहे, आणि नागांव, अलिबाग रायगड येथे १५ जणांची टीम कार्यरत आहे. आर्या ट्रस्ट धामचे अध्यक्ष श्री. तुषार पाटील यांनी आमच्या कार्याला मदतस्वरूपी खतपाणी घातले आहे.

दर जून महिन्यात आम्ही जव्हार मधील पाड्यावरील, पनवेल, बीड, सातारा तसेच जिथून मदतीची हाक येईल त्या ठिकाणी शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य वाटप करतो. नवीन वर्ष आणि दिवाळी कधी पाड्यावर, कधी अनाथाश्रम तर कधी वृद्धाश्रम अशाच ठिकाणी साजरी करतो. चाफ्याचा पाडा, जव्हार, पालघर येथे मेडिकल कॅम्प आणि ब्लॅंकेट वाटपाचे कार्यक्रम घेतले जातात.

२०१९ पर्यंत आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मदत करत होतो, परंतु एका ठिकाणी काम केल्यास अधिक परिणामकारक असेल असा विचार करून चाफ्याचा पाडा दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. महिलांना मार्गदर्शन करून, पाण्याच्या समस्येसाठी शोषखड्डे तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. २०२३ मध्ये मोकशी पाडा दत्तक घेऊन तिथेही कार्य सुरू केले.

चाफ्याचा पाडा, मोकशी पाडा, पिंपळकडा-जव्हार पालघर, नागाव-अलिबाग, नंदनपाडा-खोपोली तसेच सातारा आदर्श विद्यालय येथील शाळेमध्ये वाचनालय सुरू केले. चाफ्याचा पाडा, हिरड पाडा येथे संगणक कक्ष तसेच मोकशी पाडा येथे टॅब दिले. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था नेहमीच कार्यरत असते.

चाफ्याचा पाडा येथील कु. सचिन वड आणि कु. रुपेश बुधर यांचे शैक्षणिक पालकत्व संस्थेने घेतले होते. त्यांचे ITI चे शिक्षण पूर्ण करून आज हे दोन्ही विद्यार्थी चांगल्या कंपनीमध्ये काम करीत आहेत.

आमच्या संस्थेचे कार्य असेच अविरत पुढे चालू ठेवण्यासाठी आपल्यासारख्या मदतीच्या हातांची गरज आहे. आपल्या सदिच्छा आणि सहकार्य असेच पाठीशी असू द्या.