मैत्री शाळेशी गट्टी निसर्गाशी उपक्रम २०२४

मैत्री शाळेशी गट्टी निसर्गाशी….

दिनांक २१.०७.२०२४ @ जव्हार, पालघर

जून उजाडला की मुलं आणि पालकांची तय्यारी सुरू होते, युनिफॉर्म, स्कूल बॅग, वह्या पुस्तकं सगळ कस नव नव. मुलंही खुश आणि पालक सुद्धा. मग शाळेचा पहिला दिवस स्टेटस वर झळकतो…

हे झाल आपल आयुष्य…

सगळ्यांसाठी हे इतकं सहज सोप्प नसत, जिथे शिक्षण आणि त्याची गरज अजूनही दुरापास्त आहे अश्या दुर्गम पाड्यावर शिक्षकांना मुल शाळेत बोलावून आणावी लागतात. पालक दोघेही मजुरी करणारे लहान भावंडं घरातील इतर काम यासाठी मुलांच्या शाळा दुय्यम स्थानावर जातात. अश्या परिस्थितीत शिक्षक हा एकच दुवा आहे जो या समाजाला योग्य दिशा देऊ शकतो. शिक्षण घ्यायचं तर साहित्य ही हव मग त्यासाठी आपल्या सारख्या सामाजिक संस्था उभ्या राहतात आणि त्यांची गरज भागवतात.

अश्याच एका शिक्षकांनी तळमळीने संस्थेकडे केलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत या वर्षी नवीन शाळा जोडली गेली. श्री संतोष गवळी सर आणि त्यांची जिल्हा परिषद शाळा बोराळे, ता. जव्हार, जि. पालघर.

जून चा शेवटचा रविवार म्हणजे जव्हार दौरा अस समीकरण. पण यंदा थोडा उशीर झाला २१ जुलै २०२४ चा दिवस, पावसाचा जोर, निघायला झालेला उशीर ६.१५ ला निघणारी बस ७.१० ला निघाली, घोडबंदर रोडवरील तुफान ट्रॅफिक…

दर वर्षी १२ च्या दरम्यान शाळेत पोचणारी बस आज कितीला पोचणार याचा अंदाजच न्हवता. घोडबंदर ची ट्रॅफिक बघता फाऊंटन वरून गाडी मागे फिरवली आणि पुन्हा भिवंडी मार्गे निघालो, रस्त्याची भीषण अवस्था, मधल ट्रॅफिक आणि तुफान पाऊस…

या सगळ्यात प्रवासाचा आनंद तर घेणं तर अपरिहार्य, भिवंडी रोड ला गाडी. लागली तश्या गाण्याचा भेंड्या जोर धरू लगल्या, ख अक्षरावरून खबुतर जा, नसते मजला सुख चित्र नवे या अश्या गाण्यांच्या तोडफोडी सुरू होत्या, कल्पना आणि मंगल सुर धरत होत्या, वैभव दादा आणि गजानन दादा शब्दाला पकडुन ताल धरत होते. अभिषेक भाऊ मात्र शिक्षा मिळाल्या सारखे शांत बसले होते. मध्येच गजानन दादा याहू करून जोशात जंगली बनले. आशिष मात्र कधी पोहचू या विचारात मधेच एखाद गाणं म्हणत होते.

नाष्टा करायची वेळ निघून गेली होती, भुकेने सगळ्यांच्या पोटात कावळे नाचत होते ते बाहेर येण्या आधी नाष्टा करूया असा मागे आमचा ओरडा सुरू होता पण ड्रायव्हर आणि आशिष काही ऐकत नव्हते, दोन मिनिट पाच मिनिट करत ११.३० ला नाष्ट्या साठी गाडी उभी केली, लक्ष्मी ने भाभी कडून आणलेली मस्त इडली चटणी, सोबत मस्त मसाला चहा घेऊन सगळे फ्रेश झालो आणि पुन्हा प्रवास सुरू झाला.

तिथे शाळेतून शिक्षकांचे फोन सुरू होते कुठवर पोचलो याची चौकशी.. मुल शाळेत वाट बघत आहेत हे ऐकून रस्त्याचा आणि वेळेचा अंदाज घेत आशिष ने शेवटी चाफ्याच्या पाड्यावर सांगितल आम्हाला उशीर होईल त्यामुळे मुलांना उगाच थांबवू नका. तिथल्या सराना जव्हार ला साहित्य घेण्यासाठी या अस सांगितलं.

सगळीकडे अच्छादलेली हिरवाई, घोंगावत येणारा वारा, जोरदार सरी आणि कौलारू घरांच्या वाड्या बघत प्रवासाचा शीण जाणवत नव्हता. शेवटी २.३० च्या दरम्यान जव्हार ला पोचलो, सरांकडे साहित्य सुपूर्द केल, या वेळी चाफ्याच्या पाड्यावरची मुल, आजी, शांताराम दादा यांची भेट होणार नाही याची खंत होती आणि नवीन शाळा तिथली मुल यांची उत्सूकता ही होती, असो…

शेवटी मजल दरमजल करत ३ वाजता म्हणजे तब्बल ८ तासांनी जि. प. शाळा बोराळे मध्ये पोहचलो. पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नव्हता. शाळेतील विद्यार्थी वाट बघत बसले होते. शाळेत प्रवेश करत असतानाच फेसबुक वर ओळख झालेल्या प्रतिमा शेलार या शिक्षिका समोर आल्या अगदी हसऱ्या चेहऱ्याने उत्साहाने त्यांनी स्वागत केलं.

शाळेतल्या विद्यार्थिनींनी म्हंटले खणखणीत अवाजातल स्वागत गीत वातवरनात आणि पावसाच्या आवाजात घुमत होत. इथल्या मुलांची शिस्त नेहमीच वाखाणण्याजोगी असते. पहिली ते आठवी चे १२४ विद्यार्थी अगदी ओळीने बसले होते. “घेणाऱ्याने घेत जावे” ही विंदा करंदीकरांची समर्पक अशी कविता प्रतिमा शेलार यांनी सादर करत मुलांना अर्थ सांगितला. स्वागत, मनोगत झाले, मुलांना साहित्य वाटण्यात आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर उमललेल ते निरागस भाव तो आनंद अनुभवण म्हणजे वेगळी अनुभूती असते. आपल्या मुलांना कितीही महागडी गोष्ट द्या त्यांना नाही होत असा आनंद जो या मुलांना होतो. यातीलच विद्यार्थी घडतील आणि परिस्थिती बदलेल अशीच प्रार्थना आणि प्रयत्न असतात. याच शाळेमधला अतुल चिभडे हा विद्यार्थी आज अनेक मॅरेथॉन स्पर्धेत बक्षीस पटकावतो आहे.

मुलांशी थोड्या गप्पा झाल्या, काहींनी छान गाणी म्हणून दाखवली. यातील काही मुलांना मराठी समजत नाही आणि त्यांची स्थानिक भाषा शिक्षकांना समजत नाही ही आणि अश्या अनेक अडचणी शिक्षकांना येतात, त्यातही जिद्दीने हे शिक्षक आपल काम करत आहेत याचं कौतुक आहे.

कार्यक्रम संपवून ५ वाजता शाळेतल्या मदतनीस ताईंनी बनवलेलं डाळ, भात आणि मोड आलेल्या मटकीची उसळ अस चविष्ट जेवण केलं. परंपरे प्रमाणे स्पेशल गुलाबजाम नाईक कुटुंबाची मक्तेदारी असल्या सारखा आशिष च्या पानात पडला.

शाळेत असलेल्या पाण्याची टाकी आणि जोडलेल्या नळाची गोष्ट ऐकून वाईट वाटल. या वर काही उपाय शोधायला हवा, ही गोष्ट काय ते वेगळ्या पोस्ट मधे येईलच.

शाळेचा निरोप घेऊन ६ च्या दरम्यान निघालो.लक्ष्मी, कल्पना आणि सिध्दाई भिजण्याची जोरदार तयारी करून आल्यामुळे प्रतिमा शेलार यांनी सांगितलेल्या खडखड धरणावर गेलो पण तिथे पाण्याचा खडखडाट होता, नाही असे कसे भिजल्याशिवय जायचं या लक्ष्मीच्या जोरदार आंदोलना नंतर जव्हारच्या तलावावर गेलो, पाचच मिनिटात निघायचं अस आशिष ने आधीच बजावलं होतं पण सिध्दाई तळ्यात आडवी झाली तशी लक्ष्मीला सुद्धा घे भिजून म्हणल्या बरोबर तीही मनसोक्त डुंबली, मग कल्पना कशी मागे राहणार…

थोड फोटो सेशन, व्हिडिओ ग्राफी झाली, चेंज करून पॅटीस आणि गरमा गरम मसाला चहा घेऊन ७.५० ला परतीचा प्रवास सुरू झाला. दिवसभराचा थकवा असल्याने सगळे थोडे शांत होते पण कल्पना मात्र “झोपणे का नहीं” म्हणून उत्साह भारत होती. श्री दादा, स्वरा, सिध्दाई ही चिल्लर पार्टी पेंगुळली होती, गजानन दादा मागच्या सीट वर गेले. लक्ष्मी आणि आशिष ची दिवसभराची चर्चा सुरू होती, मंगल आणि कल्पना मात्र मधुर सुर लावून गाणी म्हणण्यात दंग होत्या. घाट सुरू झाला वळणं वाढली तशी मी झोपी गेले ते थेट फाऊंटन च्या थोड आधी जागी आली. कधी घरी पोहोचतोय अस वाटत होत. १०.४५ ला निरोप घेऊन मी उतरले, बाकीच्यांचा प्रवास अजून बाकीच होता…

जव्हार दौरा म्हणजे खूप मोठी जबाबदारी आणि ती आशिष, लक्ष्मी, कल्पना आणि इतर सभासद निभावून नेतात. लक्ष्मी ही नेहमीच आशिष च्या मदतीसाठी उभी असते. तीच खूप कौतुक वाटत आणि आशिष कल्पना या जोडी विषयी तर काय बोलावं, शब्द अपुरे आहेत.

चाफ्याच्या पाड्यावर दुसऱ्या दिवशी मुलांना साहित्य सरानी दिले, तिथल्या रिकाम्या रविवारच्या वाट बघत असलेल्या तयारीत असलेल्या रिकाम्या वर्गाचे फोटो पाहून तिथला आनंद मिस केल्याची पुन्हा जाणीव झाली, असो..

संस्थेचे सभासद, सर्व दाते आणि मित्र परिवार या सगळ्यांच्या मदतीनेच हे कार्य शक्य आहे. आपल्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार, अशीच आपली साथ नेहमी सोबत असूद्या..

1 thought on “मैत्री शाळेशी गट्टी निसर्गाशी उपक्रम २०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *